जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आता आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही अशी शपथ राष्ट्रवादीला घ्यावी लागत आहे. परंतू, दुपारी शपथ घेणारे रात्री मला फोन करतात असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. माझा निम्मा दिवस भाजपमध्ये येणाऱ्या इच्छुकांची यादी पाहण्यातच जात आहे असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. आजी आमदारांसह माजी आमदारांचीही नावे या यादीत असल्याचे महाजन यांनी यावेळी म्हटले. तसेच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसून या मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.