मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची टुकडे टुकडे गॅंग पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी आवरावी, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे माहिती नाही. पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.