मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. राज ठाकरेंची सभा नेहमीप्रमाणे चांगलीच वादळी झाली. ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनाभवनबाहेर ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स राज ठाकरेंच्या समर्थनार्थ लावण्यात आले होते. याच बॅनर्सवरून राष्ट्रवादीच्या नेत्याने राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
राज ठाकरेंच्या फोटोसह भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यावरून आता राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये जगताप म्हणतात,”राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेतील आमदारांची संख्या 288 ऐवजी 1 करावी लागेल. तो एकमेव आमदारही 3-4 वर्षात पाठींबा काढून सरकार पाडेल” असं टोला जगताप यांनी लगावला आहे.
राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेतील आमदारांची संख्या 288 ऐवजी 1 करावी लागेल. तो एकमेव आमदारही 3-4 वर्षात पाठींबा काढून सरकार पाडेल.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) March 22, 2023
शिवसेना भवन बाहेरील बॅनरवर नेमका काय लिहिलंय
शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदूंचे लोकनेते राजसाहेब ठाकरे… हा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बॅनरवर भगवी शाल परिधान केलेला राज ठाकरेंचा फोटो देखील आहे. तसेच बॅनर लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा फोटो देखील बॅनरवर दिसत आहे.
जितेंद्र आव्हाडांनी देखील केले होते भाष्य
राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे” अशी मिश्किल प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती.