रायगड : राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील मोठे दिग्गज नेते वसंत ओसवाल यांचं निधन झालं आहे, ते 83 वर्षांचे होते. वसंत ओसवाल हे शरद पवारांचे निकटवर्तीय तसंच रायगडचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून पहिले होते. तसेच ते अनेक वर्ष सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते.
वसंत ओसवाल हे मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी रायगड जिल्हा शैक्षणिक संस्थेचं अध्यक्षपदही सांभाळलं. तसंच त्यांनी रायगड जिल्हा नियोजन मंडळाचे तज्ज्ञ सभासद म्हणूनही काम पाहिलं होतं. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी वसंत ओसवाल यांचे मोठे योगदान आहे.
तसंच बहुजन समाजाच्या हितासाठीही त्यांनी योगदान दिलं. पाली सुधागड इथल्या निवासस्थानी वसंत ओसवाल यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.