भाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ – धनंजय मुंडे

पुणे – भाजपचा जाहीरनामा संकल्पपत्र नव्हे ‘मृगजळ’ आहे. मोदींनी त्यांच्या पंक्चर झालेल्या सरकारच्या टायरमध्ये कितीही घोषणांची हवा भरली तरी ती फक्त ‘चलती का नाम गाडी’ आहे हे जनता जाणते. ‘चालू’ इंजिन असलेल्या खटारा गाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर केली आहे.

भाजपाचे संकल्पपत्र नव्हे तर फसवणूक पत्र आहे. पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता यांना अद्याप करता आलेली नाही. आणि अच्छे दिन बाजूला सारत आता पुन्हा घोषणांचा ब्लास्ट केला गेला आहे. पहिले आधीचा हिशोब चुकता करा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटंल आहे.

आघाडी सरकारच्या काळात ९०% पूर्ण झालेल्या २६ सिंचन प्रकल्पाला पूर्ण करू शकले नाही, तरी सिंचनाचे हवाले देत फिरत आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, छोट्या दुकानदारांना ६० वर्षांनंतर पेन्शन देणार… कॅनव्हासवरील चित्र बरं दिसत असलं तरी त्याला सत्यात उतरवण्याची तुमची लायकी नाही, अशी घणघणाती टीका भाजप सरकारवर केली आहे.

बेरोजगारीच्या आकड्याने गेल्या ५ वर्षात उच्चांक गाठला. बेरोजगारीची कारणं देत उपाययोजना सुचवल्या असत्या तर भाजपाचा जाहीरनामा विश्वासार्ह वाटला असता. ना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला, ना त्यांना सन्मानानं जगता आलं. अहो, तुमच्या खोट्या ‘संकल्पांनी’ जनतेची पोटं भरणार नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत भाजपच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आज भाजपने जाहीरनामा सादर केला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारणार ते शेतकऱ्यांना पेन्शन सुरु करणार इथवर, असे एकूण 75 आश्वासनं भाजपने जाहीरनाम्यातून दिली आहेत. ‘संकल्पपत्र’ नावाने भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.