राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत एकाच गाडीने खडसेंचा प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

जळगाव – पक्षावर नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त भेट झाली. तसेच दोघांनी
एकाच गाडीने प्रवास केल्याचे समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत. रावेरमधील विश्रामगृहात एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली. या भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली आहे. तसेच विश्राम गृहावरून एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख
हे दोघे एकाच गाडीतून प्रवास करत घटनास्थळी पोहोचले.

शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवरातील चार अल्पवयीन बालकांची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज कुटूुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख तेथे एकत्र पोहोचले.

दरम्यान, खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. याबाबत पत्रकारांनी खडसे यांना विचारले असता त्यांनी नो कमेंट्स म्हणत चर्चा थांबवली. तसेच हे सगळे मुहूर्त माध्यमांनीच ठरवले आहेत, असे खडसे म्हणाले होते. मात्र, आज पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने
आणि गुप्त बैठक घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.