-->

ED प्रकरण: भाजप खूनशी प्रवृत्तीने वागत आहे – जयंत पाटील

कोल्हापूर – सिक्वेन्स आणि टाइमिंग पाहिले तर एकनाथ खडसे हे भाजपच्या विरोधी असल्याने भाजप त्यांच्या मागे ईडी लावत आहेत. जे-जे भाजपविरोधी आहेत त्यांच्या मागेच भाजपा ईडी लावत असून भाजप खूनशी प्रवृत्तीने वागत आहे.

खुनशी प्रवृत्तीने मागे लागणे हे यापूर्वी भारतात होत नव्हते, ते आता होताना दिसते. परंतु खडसे पूर्ण निर्दोष आहेत. त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि आम्हाला चौकशीचे कोणतेही भय वाटत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, फडणवीस बरेच वेळा इस्लामपूरमध्ये येऊन गेलेत.फडणवीस आमचे मित्र आहेत. फडणवीस येतात ते त्यांचा पक्ष स्थिरस्थावर करण्यासाठी. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भाजप वागत आहे. भाजपकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. चुकीच्या कायद्याच समर्थन करण्यासाठी फडणवीस तिथे येत असतील तर मी काय बोलायचे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणसंदर्भात सुरू असणाऱ्या सुनावणीत सरकारने संपूर्ण लक्ष दिले आहे. सरकारच्या बाजूने सर्व वकील सुप्रीम कोर्टाला मराठा आरक्षणाच महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मराठा आरक्षण टिकेल.

पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत अद्याप माझ्या पातळीवरती कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच तो आमचा पक्षांतर्गत विषय असून पक्षश्रेष्ठी बसून निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.