राष्ट्रवादीकडून भैया नाही तर काकाच ; आज अधिकृत उमेदवारी जाहीर होणार

लॉबीमुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब

नगर: अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी चार महिन्यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत ज्या नावावर शिक्‍कामोर्तब झाले होते. ते नाव आता राष्ट्रवादीने आमदार अरूण जगताप यांच्या नावाने निश्‍चित केले असून उद्या सकाळी अधिकृतपणे आ. जगताप यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला भय्या की काका हा घोळ मिटाला असून (भय्या) आमदार संग्राम जगताप यांनी नकार दिल्याने (काका) अरूण जगताप हे आता लोकसभेचे उमेदवार राहणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उमेदवार निश्‍चितेचे गुऱ्हाळ सुरू होते. आठ दिवसापूर्वी आ. जगताप पिता-पुत्राचे नाव चर्चेत आहे. आ. अरूण जगताप कि आ. संग्राम जगताप हा घोळ सुरू होता. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यपातळीवरील नेत्यांनी युवक म्हणून आ. संग्राम यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तर आ. संग्राम यांनी त्याचे पिता आ. अरूण जगताप यांच्या नावाचा आग्रह धरला. अर्थात आ.अरूण हेच लोकसभेसाठी इच्छुक आहे. प्रतिस्पर्धी भाजपचा उमेदवार डॉ.सुजय विखे हे युवक असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार युवक असा म्हणून आ. संग्राम यांचे नाव लावू धरण्यात आले होते. परंतू आ. अरूण जगताप यांचा विरोध होता. कारण आ. संग्राम हे विद्यमान नगर शहराचे आमदार आहे. त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर शहरात पक्षांतर्गत विरोधकांचा आमदारकीसाठी दावा होवू शकतो. ती त्यांना मिळू नये म्हणून आ.संग्राम यांनी लोकसभेची उमेदवारी करू नये म्हणून त्यांचा प्रयत्न होता. या आ. पिता-पुत्रातील निर्णयामुळे राष्ट्रवादीला दोन दिवस उमेदवार जाहीर करण्यास ताटकळत राहवे लागले.

अखेर आज पुन्हा मुंबईत याबाबत जिल्ह्यातील निवड नेत्यांची चर्चा झाली. त्यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली असून छोटे की मोठे आ.जगताप यावर पवारांच्या प्रश्‍नाला नेत्यांनी मोठे जगताप असा निर्णय सांगितला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आ. अरूण जगताप यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता असून उद्या पक्षाकडून अधिकृतपणे घोषणा होणार आहे. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवितांना पक्षापुढे अनेक नावाची चर्चा झाली. आ. जगताप यांचे नाव चार महिन्यापूर्वीच निश्‍चित झाले होते. परंतू मध्यतंरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने अनेक नावे पुढे आली. त्यात अंतिम निर्णयापर्यंत महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव आले होते. परंतू त्यानंतर यशवंत प्रतिष्ठाणचे प्रशांत गडाख यांचे नाव आले. त्यानंतर पुन्हा चार महिन्यापूर्वीचे आ. जगताप यांचे नाव आले आणि ते अंतिम निर्णयापर्यंत आले. अचानक आ. जगताप यांचे नाव आल्याने जिल्ह्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पक्षात मोठ्याप्रमाणावर लॉबी सुरू झाली. आ. जगताप यांच्या बाजूने तसेच विरोधातही लॉबी सुरू आहे.

पक्षांतर्गत लॉबी झाल्या सक्रिय

आ. जगताप यांचे नाव अचानक पुढे आल्याने विरोधकांनी शरद पवार यांच्यापुढे अनेक पर्याय आणले. तर आ. जगताप यांच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांनी हा एकच पर्याय असल्याचे सुचविले. विशेष म्हणजे या दोन्ही बाजूच्या लॉबीमध्ये जिल्ह्यातील नेते सक्रिय होते.त्याच लॉबीमधून आ. जगताप पिता-पित्रामध्ये उमेदवारीचा घोळ घालण्यात आला. युवक म्हणून आ. संग्राम याचे नाव पुढे करण्यात आले. त्यामुळे आ. जगताप बाजूच्या नेत्यांची कोंडी झाली होती. अखेर या नेत्यांनी पर्याय एकच म्हणून आ. जगताप यांचे नाव लावू धरल्याने त्यामुळे आ. जगताप यांचे नाव निश्‍चित झाले असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.