राष्ट्रवादीने विधानसभेच्या इच्छुकांचे मागविले अर्ज

भोसरी, पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघाचा समावेश

पिंपरी – विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची जोरदार तयारी चालविली आहे. या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. गुरुवार दि. 27 ते सोमवार दि. 1 जुलैपर्यंत पक्षाच्या कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्‍टोबर महिन्यात होणार असून 15 सप्टेंबर 2019 च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेची तयारी चालविली आहे. मुंबईत विभागवार बैठका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेताना लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसाही या बैठकीत करण्यात आली होती. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच विजयी होणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचे सुतोवाच पवार यांनी केले होते.

बैठकांचे सत्र संपताच आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुकांचे अर्ज स्थानिक शहर-जिल्हा कार्यालयात जमा करावयाचे असून त्याबाबत पक्षाचे एक छापील अर्ज उपलब्ध करून दिला आहे. या अर्जात व्यक्‍तीगत संपूर्ण माहिती द्यावयाची आहे. तसेच सर्वसाधारण मतदारसंघातील इच्छुकाला 5 हजार रुपयांचा डी.डी. पक्षासाठी वर्गणी म्हणून द्यावयाचा आहे. तर मागासवर्गीय व महिला इच्छुक सदस्याला अडीच हजार रुपयांची वर्गणी पक्षाला देणे बंधनकारक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.