राष्ट्रवादीला ना इतिहास ना भविष्य

कवठे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. देशासह राज्याच्या राजकारण, समाजकारणातील हा मोठा माणूस आहे. त्यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय यशस्वीतेमध्ये विश्‍वासार्हता हा खूप मोठा अडसर ठरलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षाला ना इतिहास ना भविष्य राहिलेले नाही. त्यामुळे सातारा जिल्हा कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, असा इतिहास असेल आणि हेच या पक्षाचे भवितव्य असेल, अशी सणसणीत टीका भाजपचे वाई मतदार संघाचे उमेदवार मदन भोसले यांनी केली.

दरम्यान, संकुचित प्रादेशिक पक्षाबरोबर राहण्यापेक्षा राष्ट्रीय प्रवाहाबरोबर राष्ट्रीय विचारधारा असलेल्या भाजप पक्षाबरोबर राहिले पाहिजे, या भूमिकेतून उदयनराजे भोसले आणि मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. फुलेनगर (वाई) येथील कोपरा सभेत ते बोलत होते.

यावेळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, अल्पसंख्याक मंडळाचे जिल्हाध्यक्ष सादिकभाई शेख, आरपीआयचे वाईचे अध्यक्ष युसुफ बागवान, नगरसेवक महेंद्र धनवे, सतिश वैराट, सुमैय्या इनामदार, सुनिता चक्के, वासंती ढेकाणे, रूपाली वनारसे, अमजद इनामदार, भाजप शहराध्यक्ष अजित वनारसे, माजी नगराध्यक्ष वामनराव जमदाडे, माजी नगरसेवक शेखर शिंदे, अरूण जमदाडे, विजय ढेकाणे, कारखान्याचे संचालक अरविंद कोरडे, शेखर जमदाडे, मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

मदन भोसले म्हणाले, राज्याच्या विकासाचा पाया आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातला. प्रत्येक मुख्यमंत्र्याने आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाचा कळस त्यावर चढविण्याचे काम करत आहेत. राज्य दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, समृद्ध आणि संपन्न करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना साथ देण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.

त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटण दाबून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई विधानसभा मतदार संघातून मला प्रचंड मताधिक्‍क्‍याने निवडून द्यावे, असे आवाहन करुन मदन भोसले पुढे म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात मारलेल्या थापा, फसवा विकास, विकासनिधीबाबत केलेली दिशाभूल याची नकारात्मक चर्चा संपुर्ण मतदार संघात होत असल्यामुळे ते गेल्या दहा वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा किसन वीर कारखान्यावर बोलत सुटले आहेत.

कारखान्याचं वाटोळं केलं, आता ते मतदार संघाचे वाटोळे करतील, अशी दिशाभूल ते करीत आहेत. वास्तवित अकरा वर्षे कारखान्याची सत्ता त्यांच्या घरात होती. त्यांच्या काळातच कारखान्याचं वाटोळं झालं. विकासाचा डोंगर उभा केल्याचा डांगोरा पिटणाऱ्या आमदारांनी तालुक्‍यातील रस्ते, पाणी आदींची काय अवस्था आहे, ती जरा तपासावी.

Leave A Reply

Your email address will not be published.