बीड – राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना आणखी एक धक्का बसला आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. त्यामुळे पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेतील वर्चस्व कमी होताना दिसत आहे.
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 29 ग्रामपंचायतपैकी 21 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या मानतील आमदार कोण असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
यातच बीड शहरातील काकू नाना विकास आघाडीमधील प्रमुख दावेदार म्हणून असलेले नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैयासाहेब मोरे, रंजित बनसोडे या चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशाने संदीप क्षीरसागर गटाला मोठा धक्का समजला जात असून विद्यमान आमदार बॅकफुटवर जात असल्याची चर्चा सुरू आहे.