राष्ट्रवादीने आयुक्‍त कार्यालयात लावला

युवक कॉंग्रेसकडून आयुक्‍तांना भाजपा प्रवेश करण्याचा खोचक सल्ला

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या भाजप शहर कार्यालयातील उपस्थितीबाबत शहर युवक कॉंग्रेसने आयुक्‍तांचा निषेध करत त्यांना भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या या कृत्याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक कॉंग्रेसने निवेदनाद्वारे आयुक्‍तांकडे केली आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांना याबबातचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एनएसयूआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या शहर भाजप कार्यालयातील उपस्थितीचे पडसाद बुधवारी (दि.26) महापालिकेत उमटले. राष्ट्रवादीच्या वतीने आयुक्‍त कार्यालयाचे नामकरण “भाजप पक्ष कार्यालय’ असे करण्यात आले. तर आयुक्‍तांचे पददेखील भाजप प्रवक्‍ता असे करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आयुक्‍तांनी भाजपचे उपरणे गळ्यात घातल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत, सर्व राजकीय विरोधी पक्षांच्या कार्यालयांनादेखील भेट देण्याचे निमंत्रण दिले. नगरसेवक मयूर कलाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्‍ती झाल्याबद्दल चंद्रकात पाटील आणि राज्यमंत्रीपदी नियुक्‍ती झाल्याबद्दल भाजपच्या वतीने मोरवाडीतील शहर कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी स्वत: आयुक्‍त हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात गेले आणि पालकमंत्र्यांची सरबराई केली. राजशिष्टाचाराप्रमाणे पक्ष कार्यालयाच्या इमारतीच्या खाली अथवा गैरपक्षीय ठिकाणी आयुक्‍तांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते. परंतु, आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी थेट भाजप कायालयात हजेरी लावल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले.

मयूर कलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्‍त कार्यालयात अनोखे आंदोलन केले. आयुक्‍त कार्यालयाचे नामकरण “भाजप पक्ष कार्यालय’ असे केले. तर आयुक्‍तांच्या नेमप्लटेखाली भाजप प्रवक्‍ता असे स्टीकर्स चिटकविले. या आंदोलनात राहुल भोसले, विक्रांत लांडे, राजू बनसोडे, जावेद शेख, पंकज भालेकर, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेडवक विनोद नढे सहभागी झाले होते.

यावेळी मयुर कलाटे म्हणाले की, जिल्ह्याचे नवनियुक्‍त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र, आयुक्‍तांनी पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी भाजप कार्यालयात जाऊन,शिष्टाचाराचा भंग केला आहे. त्यांच्या या वर्तणुकीच्या आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. भाजपच्या बाजूने झुकणारे आयुक्‍त हर्डीकर यांच्याकडून निष्पक्षपणे काम होईल, अशी सूतराम शक्‍यता नाही. त्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांना भेट द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्डीकर यांच्यावर कारवाई न केल्यास, राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्‍ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत येत होते. त्यांचा भाजप कार्यालयाव्यतिरिक्‍त अन्य कोणताही कार्यक्रम नव्हता. केवळ त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तेथे गेलो होतो.

श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)