इंदापूर तालुक्यातील इंदापूर बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव माने यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. तर, इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळणार आहे. त्याचपाठोपाठ मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादीने माने यांनी रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेले दोन उमेदवार विधानसभेत पोहोचणार काय, याची उत्सुकता इंदापूर आणि मोहोळ मतदारसंघात लागून राहिली आहे. येथे माने यांनी मोहोळमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोहोळ मतदारसंघ हा राखीव गटासाठी आरक्षित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाता. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माध्यमातून रमेश कदम हे आमदार झाले होते. मात्र, कदम यांना एका महामंडळाच्या प्रकरणामुळे कारागृहात जावे लागले होते. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विचाराचा उमेदवार या मतदारसंघात असावा म्हणून थेट इंदापूर बाजार समितीचे उपसभापती माने यांना पसंती देत मोहोळच्या रिंगणात उतरवले आहे.
माने हे उद्योजक असल्यामुळे त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे माने यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
मोहोळ मतदारसंघातून माने यांना संधी मिळण्यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेत्यांनी पक्षाकडे शिफारशी केल्या होत्या, काही वर्षांपासून माने यांनी मोहोळ मतदारसंघातील जनतेशी थेट संपर्क ठेवल्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे.