लॉकडाऊनविषयी राज्यांना सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांवर राष्ट्रवादीची सडकून टीका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यांना लॉकडाउनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे. राज्यांनी लॉकडाउन टाळण्याचा प्रयत्न करावा, अखेरचा उपाय म्हणून लॉकडाउनकडे पाहावे असे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोर्टच लॉकडाउनचा आदेश देत असल्याचे म्हटले आहे.

“पंतप्रधानांनी राज्यांना लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असावा असे सांगितले आहे. पण देशातील अनेक कोर्ट लॉकडाउनचा आदेश देत आहेत. पंतप्रधान स्थलांतरित मजूर, गरीब आणि छोट्या उद्योजकांसाठी मदत निधी जाहीर करतील अशी लोकांना अपेक्षा होती,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८.४५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील करोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केले. ‘देश करोनाशी मोठी लढाई लढत आहे. गेल्या वर्षाअखेर परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, दुसरी लाट मोठी असून, सरकार तिचा पूर्ण सामर्थ्याने सामना करत आहे. आव्हान मोठे असले तरी निर्धार, धाडस आणि तयारीने संकटावर मात केली पाहिजे’, असे सांगत मोदी यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे दाखले दिले. करोनायोद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील अन्य कर्मचाऱ्यांबद्दही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

गेल्या वर्षी लॉकडाउननंतर स्थलांतरित मजुरांची गावाकडे रिघ लागली होती. त्यामुळे आता राज्य सरकारांनी या मजुरांना रोजगार आणि निर्वाहाबाबत आश्वस्त करावे, असे आवाहन मोदी यांनी केले. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी देशव्यापी टाळेबंदीची शक्यता फेटाळतानाच राज्यांनाही अपवादात्मक स्थितीतच टाळेबंदी लागू करण्याचा सल्ला दिला. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून, १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.