ठाणे – ठाण्यातील कळवा विभागात गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे आज पहाटे कोविड-19 आजारामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेले चौदा दिवस मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र, त्यांची या आजाराशी सुरु असलेली झुंज आज अखेर अयशस्वी ठरली. त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा देखील त्रास होता. डॉक्टरांनी या आजारातून त्यांना मुक्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, सगळे प्रयत्न विफल ठरले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे.
मुकुंद केणी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कळवा विभागात निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक होते. ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सलग दोन वेळा निवडून आले होते. सध्या त्यांच्या पत्नी प्रमिला केणी या ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेत्या आहेत.
दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा मंगळवारी करोनामुळे मृत्यू झाला. शिवसेनेच्या या नगरसेवकावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आठवड्यापूर्वी या नगरसेवकासह त्यांची आई, बायको आणि भाऊ यांनादेखील करोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.