पुणे- रस्त्यातील जागेच्या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर चिटणीस जुबेर बाबु शेख (41, रा.भवानी पेठ) यांना चार लाखाची खंडणी मागण्यात आली होती. ही रक्कम स्विकारताना तीघा आरोपींना खंडणी विरोध पथक दोनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक विजय निंबाळकर (29,रा.हवेली), गणेश जगताप(28,रा.हडपसर) आणि अमर अबनावे(29,रा. उरळी देवाची) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मौजे पिसोळी येथे त्यांच्या प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिपक निंबाळकर यांनी राडा रोडा टाकला होता. हा राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी शेख व त्यांच्या मित्राला चार लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही रक्कम स्विकारताना आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण करत आहेत.