कोल्हापूर – देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ मधील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. शिरोळ इथं एका महाविद्यालयात या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांची छावणी सुरू आहे. या छावणीला आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान स्वतः शरद पवार यांनी भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. महापूर आल्यामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. यानिमित्त पूरग्रस्त भागाची पाहणी आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
आज सकाळी साडेअकरा वाजता पवार यांनी शिरोळ परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या छावणीला भेट दिली तसेच त्यांच्या व्यथा देखील जाणून घेतल्या. आर. आर. पाटील असताना आम्हाला त्यांनी पुरातून बाहेर काढलं होतं. परंतु आताच्या पुरातून आम्हाला बाहेर काढायला कोणीच आले नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केल्या.
यावेळी शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र यड्रावकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.