अहमदनगर : एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. मात्र या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत घेत राम शिंदेनी हा आरोप केला आहे. 70 हजार कोटींची सिंचन घोटाळ्याची ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. एकनाथ खडसे हे यातील प्रमुख साक्षीदार आहेत, त्यामुळे प्रमुख साक्षीदार राष्ट्रवादीने फोडल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी जयंत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला.
10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. मात्र एकही आमदार त्यांच्या सोबत गेला नाही असे म्हणत राष्ट्रवादी पक्षात कोणतीही भरती होणार नाही असे स्पष्टीकरण राम शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, राम शिंदेंनी आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका करत पवार यांनी मागील एका वर्षात समाजकारण केले पण त्याला व्यवसायाचे रूप दिले असल्याचेही त्यांनी म्हटले.