Chhagan Bhujbal: काही दिवसांपूर्वीच भाजपकडून शिर्डीत महाविजयी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही (अजित पवार) भाजपच्या पावलांवर पाऊल टाकत शिर्डीत पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर शिर्डीमधील पुष्पक रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. आजपासून (18 जानेवारी) सुरु होणाऱ्या 2 दिवसीय शिबिरामध्ये पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला आमदार छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.
मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी देखील वारंवार व्यक्त केली होती. आता या नाराजी नाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. छगन भुजबळांसोबतच मंत्री धनंजय मुंडे देखील या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
याआधी छगन भुजबळ नवसंकल्प शिबिराला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनंतर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिरानिमित्ताने शिर्डीत ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत.
लवकरच राज्यात महापालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून या दोन दिवसीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला पक्षाचे सर्व प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.