NCMC Card Scam – मेट्रो, बस, लोकल ट्रेन, पार्किंग टोल इत्यादी ठिकाणी उपयुक्त ठरणारे नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड एसटी महामंडळाने सुरू केले आहे. मात्र, या कार्डच्या वाटपात प्रवाशांची लूट सुरू असल्याने नाराजीचा सूर आहे. केंद्र सरकारच्या ‘वन कार्ड’ उपक्रमांतर्गत नॅशनल कॉमन मोबिलिटी हे डिजिटल कार्ड असून, त्याचा मेट्रो, बस, लोकल ट्रेन, पार्किंग, टोल इत्यादी ठिकाणी वापर करता येणार असल्याने, या कार्डच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. एसटी महामंडळाने या कार्ड वाटपाचे काम मुंबईतील इबिक्स कॅश पेमेंट सर्व्हिस या कंपनीस दिले आहे. या कंपनीकडून सातारा जिल्ह्यामध्ये 70 जणांना कार्ड वाटपाचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजनेतील लोकांनाच या कार्डाचा वापर करता येईल. या योजनेंतर्गत प्रवास करताना हे कार्ड सादर करायचे असून, प्रवासाच्या भाड्याची रक्कम या कार्डद्वारेच द्यावी लागणार आहे. एसटी बस हे कार्ड नसल्यास प्रवासाचे पूर्ण भाडे भरावे लागणार आहे, असे एसटी महामंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे; परंतु हे कार्ड काढण्याची अंतिम मुदत दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. या कार्डाची किंमत 199 रुपये असून, अनेक परवानाधारक 250 ते 400 रुपयांपर्यंत आकारणी करून, जनतेची लूट करत आहेत. यासंदर्भात सातारच्या विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, या खाजगी आस्थापनेस लेखी आदेश दिले असून, याबाबत सखोल चौकशी करणार असल्याचे सांगितले. एसटी महामंडळाच्या भरारी पथकाकडूनही तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित परवाने वरिष्ठ अधिकार्यांनी आपल्या नातेवाइकांना व हितचिंतकांना दिल्याचा आरोप होत असून, याची चौकशी होणार का, हा प्रश्न आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई याबाबत इबिक्स कॅश पेमेंट सर्व्हिसचे एरिया सेल्स मॅनेजर सर्वेश घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अशा आठ परवानाधारकांवर दंडात्मक कारवाई करून, त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कार्डसंदर्भात तक्रार असल्यास 8007861519 या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा. ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार आहे.