NCMC Card : एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करताना आवश्यक असलेले एनसीएमसी कार्ड मिळवतानां प्रवाशांची लूट होत आहे. या कार्डच्या विक्रीसाठी नियुक्त केलेले काही एजंट अधिकृत शुल्काशिवाय अतिरिक्त 100 ते 150 रुपये आकारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रवाशांसाठी पारदर्शक आणि डिजिटल व्यवहार प्रणाली लागू करण्याच्या उद्देशाने, एसटी महामंडळाने 1 एप्रिलपासून एनसीएमसी कार्ड योजना सुरू केली आहे. राज्यात दोन हजार 957 अधिकृत विक्रेत्यांमार्फत कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक अर्ज आले असून, चार लाख कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. Pune District : शिक्रापुरात नदीकाठी नवजात बालक आढळले महामंडळाने या कार्डची किंमत 199 रुपये निश्चित केली असताना, एजंट अॅक्टिव्हेशन किंवा रिचार्जच्या नावाखाली नागरिकांकडून अतिरिक्त 100 ते 150 रुपये उकळत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, अतिरिक्त पैसे दिल्यानंतरही कार्डमध्ये रिचार्ज होत नसल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे. नोंदणीनंतर साधारण 30 दिवसांनी कार्ड मिळत असले, तरी ते प्रवाशांना देताना नियमबाह्य वसुली होत आहे. प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या कार्डसाठी नागरिकांनी जादा पैसे देऊ नयेत. एजंट अतिरिक्त पैसे घेत असल्यास, नागरिकांनी टोल फ्री नंबर, पोर्टल किंवा संबंधित विभाग नियंत्रण कार्यालयात तक्रार करावी. एजंट दोषी आढळल्यास, त्याचे कंत्राट रद्द करण्यात येईल अशी माहिती एसटी महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली. Satara News : केसकर कॉलनीतील कामाबद्दल ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार