Hinduja Group-Reliance Capital Deal: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीची या महिनाखेरीस विक्री होणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने कर्जात बुडालेल्या या कंपनीच्या विक्रीस परवानगी दिली आहे. एनसीएलटीने इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडला (IIHL) कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी मंजूरी दिली आहे.
न्यायाधिकरणाकडून परवानगी मिळाल्याने IIHL 26 फेब्रुवारीपर्यंत रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण करू शकते. सुनावणीदरम्यान आयआएचएलने आवश्यक कागदपत्रे सादर करत, सर्व आर्थिकबाबींची अंमलबजावणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.
न्यायाधिकरणाने यापूर्वीच IIHL च्या याचिकेला मान्यता दिली होती. यात 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार असून, यावेळी अधिग्रहण योजनेच्या अंतिम टप्प्यावर चर्चा होईल. तसेच, रिलायन्स कॅपिटल व उपकंपन्यांचे नियंत्रण आयआयएचएलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला जाईल.
रिपोर्टनुसार, रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक देखरेख समितीची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत निधीपुरवठ्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण केली जाऊ शकतील आणि निर्धारित अंतिम मुदतीपूर्वी निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करता येईल.
हिंदुजा समूहाची कंपनी असलेल्या IIHL च्या कर्जदारांनी आश्वासन दिले केला आहे की ते रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या समाधान योजनेच्या एकूण 9,861 कोटी रुपयांपैकी उर्वरित 4,300 कोटी रुपये देण्यासाठी तयार आहेत. IIHL ने आधीच या अंतर्गत एकूण मूल्याच्या 58 टक्क्यांहून अधिक (5,750 कोटी रुपये) रक्कम विविध एस्क्रो खात्यांमध्ये जमा केली आहे.