नायकोबा जत्रा उत्साहात पार.. कुस्त्यांचे भव्य मैदान संपन्न..

वाघळवाडी – मासाळवाडी (ता. बारामती) येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत नायकोबा देवाची जत्रा गुरुवारी (दि.२८) रोजी उत्साहात पार पडली. गेल्या ५ वर्षापासून नायकोबा यात्रेनिमित्त यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे सहावे वर्ष होते. शुक्रवारी दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत या कुस्त्यांचे मैदान भरण्यात आले होते. आखाड्यात पै. दीपक पाटील हे गदेचे मानकरी ठरले. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात याठिकाणी नायकोबा देवाची मोठी जत्रा भरते.

कुस्ती आखाड्याचे उद्घाटन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विकासअण्णा बारवकर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक प्रा. पी. एम. गायकवाड सर यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाच्या कुस्तीचे १ लाख रू. बक्षीस देण्यात आले. यामध्ये पै. विकास सुळ व पै. सुनिल शेवतकर यांची कुस्ती बराच वेळ चालल्यानंतर बरोबरीने सोडवण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाची ९१ हजार रुपये बक्षीस असणारी कुस्ती पै. हनुमंत पुरी आणि पै. नवनाथ इंगळे यांच्यात झाली.

ही कुस्ती पै. हनुमंत पुरी यांनी समोरून लपेट या डावावर जिंकली. यासाठी देवगिरी करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष महादेव विठोबा चोपडे यांनी कै. विठोबा शिवाजी चोपडे यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस ठेवले होते. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. संतोष पडळकर आणि पै. पप्पू काळे यांच्यात लावली गेली होती. यामध्ये पै. पडळकर यांनी पोकळ घिस्सा डावावर ही कुस्ती जिंकली. या कुस्तीसाठी ८१ हजार रुपयाचे बक्षीस उमाजी गुंडा टकले यांनी ठेवले होते.यावेळी तब्बल ४७ कुस्त्या लावण्यात आल्या. नवनाथ कुस्ती केंद्र मगरवाडी येथील पैलवानांनी या आखाड्यात चांगल्या कुस्त्या केल्या. यासाठी बक्षीस रूपाने एकनाथ टकले, विठ्ठल टकले, मालबा टकले, गणपत टकले, खंडू कोळेकर, दादा कोळकर, पै.माणिक काळे, विठठल कोकरे, भालचंद्र भोसले, दत्तु टकले, भाऊसाहेब कांबळे आदींनी मदत केली.

या कुस्तीच्या आखाड्यासाठी भाऊसाहेब टकले, खंडू कोळेकर, बापू टकले, पै.आबा सुळ, पै.विकास जाधव, पै.भाऊसाहेब पडळकर आदींनी पंच म्हणून काम पाहिले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष विकासआण्णा बारवकर, सर्व पांजकरी, भक्त, मासाळवाडी, लोणी भापकर, पळशी, कानाडवाडी, सस्तेवाडी, तरडोली व पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी यासाठी सहकार्य केले. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडेसाहेब व त्यांचे सहकारी यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ पै. शंकर आण्णा पुजारी यांनी कुस्त्यांचे सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.