दंतेवाडा – छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना एका नक्षलवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही चकमक सुरक्षा दलाची दोन स्वतंत्र पथके नक्षवादविरोधी कारवाई करीत असताना पितेपाल गावाजवळ सकाळी नऊ वाजता उडाली. दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील काटेकल्याण जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर माओवादी लपुन बसले असल्याची गुप्तमाहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुमारे 400 जवानांना तेथे पाठविण्यात आले. या नक्षलवाद्यांची मोठा हल्ला करण्याची योजना होती.
एक पथक पितेपाल गावातील जंगलास वेढा घालत असताना दोन्ही बाजूंनी गोळीबारास सुरुवात झाली. मात्र नक्षलवादी लवकरच घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन मॅगझीन्स हस्तगत करण्यात आले.
या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी राखीव दलाचा साहाय्यक कॉन्स्टेबल कैलास नेताम याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे पलिसांनी सांगितले. ठार झालेल्या नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.