मुंबई – नक्षलवादविरोधात महाराष्ट्र पोलिसांना मोठे यश मिळले आहे. जहाल नक्षलवादी अलुरी कृष्णा कुमारी ऊर्फ नर्मदाक्का आणि तिचा पती किरण कुमार उर्फ किरण दादा यांना पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केले आहे. किरण कुमार आणि नर्मदाक्का या दोघांवरही प्रत्येकी २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
महाराष्ट्रातील गडचिरोली, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या परिसरात दाम्पत्याची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. मात्र, आता या दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर या दाम्पत्याला आता हैद्राबाद येथून महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आणण्यात आलं आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यामागे सुद्धा हेच दाम्पत्य असल्याचं समोर आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. गेल्या २० वर्षांत नक्षलवादी हल्ल्यात झालेल्या १५० पोलिसांच्या मृत्यूस जबाबदार हे दाम्पत्य जबाबदार आहे.
जहाल नक्षलवादी असलेल्या किरण कुमार आणि नर्मादाक्का यांना झालेली अटकेमुळे नक्षलवाद्यांना एक जोरदार झटका बसला असेल यात शंका नाही. या दाम्पत्याच्या अटकेमुळे आता नक्षलवादी कारवाई करण्यास अधिक गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, कृष्णा कुमारीचं वय ६० वर्षे असून ती आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील रहिवासी आहे. कृष्णा कुमारी ही नक्षलवादी चळवळीत गेल्या २२ वर्षांपासून सक्रीय असल्याची माहिती आहे.