छत्तिसगढमधील नक्षलवादी हल्ला राजकीय कारस्थान-अमित शहा

सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
राजनांदगाव – छत्तिसगढमध्ये अलिकडेच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. त्या हल्ल्याची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
छत्तिसगढमध्ये मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मांडवी मृत्युमुखी पडले. त्या हल्ल्यात 4 पोलीसही शहीद झाले. त्याचा संदर्भ देत शहा यांनी छत्तिसगढमधील सभेत हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला.

लोकसभेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपने छत्तिसगढमधील 11 पैकी 10 जागा जिंकल्या. यावेळी सर्व जागा जिंकण्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यावरून शहा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. त्या हवाई हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केवळ पाकिस्तानात आणि कॉंग्रेसच्या कार्यालयात दु:खाचे वातावरण होते, अशी टिप्पणी त्यांनी केली. छत्तिसगढमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारताना भाजपचा दणदणीत पराभव केला. त्या पराभवातून धडा घेतलेल्या भाजपने त्या राज्यातील सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कापून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नवे चेहरे उतरवले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.