मुंबई – नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसिरीज “सेक्रेड गेम्स’मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता ओटीटीला रामराम ठोकणार आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेली “सेक्रेड गेम्स’ वेबसिरीजमधील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.
तर 2020 मध्ये या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागातही नवाजुद्दीनने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती, पण आता नवाजुद्दीन सिद्दीकीने वेबसिरीजमध्ये काम न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
“सेक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेबसिरीजनंतर नवाजुद्दीनचे काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. “रात अकेली है’, “धूमकेतू’ आणि “सिरीयस मॅन’ अशा काही चित्रपटातून नवाजुद्दीन दिसला होता, पण गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन ओटीटी कंटेंटबाबत खुलेपणाने आपली नाराजी व्यक्त करत आहे.
ओटीटीवरील वेबसिरीज खालच्या पातळीला जात असल्याची चिंता नवाजुद्दीनने व्यक्त केली होती. अशातच आता नवाजुद्दीनने वेबसिरीजमध्ये काम करणार नसल्याचा मोठा खुलासा केला आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच “टीकू और शेरू’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कंगना राणावतच्या प्रोडक्शन हाऊस “मणिकर्णिका’ फिल्म्सच्या अंतर्गत तयार होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे.