मुंबई – कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले. यानंतर ऋषभ शेट्टीने कांतारा 2 ची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांना मोठा आनंद झाला. अशात यामध्ये आता नवीन चेहरे कोणते येणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असताना याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने कांतारा आणि ऋषभ शेट्टीबाबत भाष्य केले. यामुळे आता कांताराच्या प्रीक्वलमध्ये नावाजची एंट्री होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
कांताराचा दुसरा भाग हा सिक्वल नसून प्रीक्वल असणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. अशात नावाजने ऋषभ शेट्टीचे कौतुक केल्याने आता नवाज कांताराच्या दुसऱ्या भागात झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी जेव्हा नवाजने ऋषभ शेट्टीची भेट घेतली होती. त्यावेळी देखील नवाजने ऋषभसोबत काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र यावेळी त्याला कांतारामध्ये दिसणार का याबाबत विचारले असता त्याने थेटपणे उत्तर न देता ऋषभ आणि त्याच्या संबंधांबाबत भाष्य केले.
एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की तो ऋषभ शेट्टीच्या थिएटरशी संबंधित आहे. अभिनेता म्हणाला, ‘मी ऋषभ शेट्टी थिएटरशी संबंधित आहे. ऋषभ शेट्टी नेहमीच त्याच्या गृटसोबत आणि पारंपारिक स्वरूपाशी खरा राहिला आहे. त्यावर तो एक चित्रपटही बनवत आहे. आम्हा दोघांचे गुरुही एकच आहेत. आमचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही आता मित्रही आहोत.नवाजुद्दीनच्या या वक्तव्यानंतर आता अभिनेता ऋषभ शेट्टीच्या आगामी ‘कांतारा 2’ या चित्रपटात काम करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाजुद्दीन नुकताच सुधीर मिश्रा यांच्या ‘अफवाह’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सुमित व्यास आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. नवाजुद्दीन सिद्दीकी पुढे नेहा शर्मासोबत ‘जोगिरा सा रा रा’ या चित्रपटात दिसणार आहे.