“सॅक्रेड गेम्स’: मनोरंजनाची रोलर कोस्टर राईड

प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक लढाई लढत असतो. मग ती अस्तित्वाची असो वा सन्मानाची! या लढाईत तो स्वतःशीही भांडत असतो अन् स्वतःचा शोधसुद्धा त्याला नव्याने लागत असतो. अशाच अवस्थेत असलेल्या पोलीस ऑफिसर “सरताज’ला भारतातून बऱ्याच वर्ष बाहेर असलेला आणि नुकताच मुंबईला आलेला कुख्यात माफिया “गणेश गायतोंडे’चा फोन येतो. मुंबईवर 25 दिवसांनंतर फार मोठा धोका असून सगळं काही नष्ट होणार असल्याचे तो कळवतो आणि तिथून सुरू होतो एक चित्तथरारक प्रवास! गणेश गायतोंडेचा भूतकाळ, मुंबईमधला माफिया वॉर आणि 25 दिवसांवर येऊन ठेपलेल्या संकटाच्या मुळाशी जाण्यासाठी सरताजच्या धडपडीची रोलर कोस्टर राईड!

नेटफ्लिक्‍सवर पहिली भारतीय ओरिजनल सिरीज असलेल्या “सॅक्रेड गेम्स’ची कथा गायतोंडे आणि सरताज यांच्या दोन वेगवेगळ्या कालखंडात समांतर चालते. गायतोंडेचा लहान मोठ्या चोऱ्या चपाट्यापासून ते कचरा किंग बनेपर्यंतचा प्रवास अधोरेखित करणारा एक वेगळा ट्रॅक आहे तर दुसरा ट्रॅक सरताजची धडपड दर्शवतो. 25 दिवसांनंतर मुंबईवर येणारा धोका हा या दोन्ही पटांना जोडून ठेवणारा दुवा म्हणून काम करतो. मालिकेची कथा सहज आणि सोपी ठेऊन गायतोंडेचे फ्लॅशबॅक्‍स दाखवताना तत्कालीन राजकीय परिस्तिथिती सॅक्रेड गेम्समध्ये सुरेखरीत्या गुंफली आहे. नवाज आणि सैफ या दोन्ही पात्रांच्या कथेचं दिग्दर्शन अनुक्रमे अनुराग कश्‍यप आणि विक्रमादित्य मोटवाणे यांनी केले आहे. गॅंग्स, माफिया हा विषय म्हणजे अनुरागचे होमग्राऊंड आहे. सत्या, गॅंग्स ऑफ वासेपुर, रमन राघव या अनुरागनेच प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या मानकांना सॅक्रेड गेम्स तोडीस तोड आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“कभी कभी लागता है की अपूनही भगवान है’ म्हणणारा, स्वतःला सर्वशक्तीशाली मानणाऱ्या गणेश गायतोंडेची भूमिका नवाजुद्दीननी अक्षरशः जगली आहे. धर्म आणि देवाबद्दल गायतोंडेची मतं तसेच मुंबईबद्दल त्याचं प्रेम दर्शवतानाच त्याचा क्रूर व मग्रूर चेहरासुद्धा तितक्‍या खुबीने दाखवण्यात नवाजुद्दीन यशस्वी ठरला आहे. अशा धाटणीच्या पात्रांमध्ये आपणच बादशाह असल्याचं त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पोलीस ऑफिसर ‘सरताज’च्या भूमिकेत सैफ साजेसा दिसत आहे. नेहमी अंडररेटेड मानल्या गेलेल्या परंतु धडपड्या ऑफिसरच्या भावनांना त्याच खुबीने सैफनी साकारलं आहे. नीरज काबीने साकारलेला “परुळेकर’ आणि राधिका आपटेनी साकारकेली रॉ एजंट “अंजली माथूर’ उत्कृष्ट आहेत. जितेंद्र जोशींचा “काटेकर’ सामान्य पोलिसांचा प्रतिनिधी वाटतो तसेच मराठी मिश्रित हिंदी बोलणारा राजकारणी गिरीश कुलकर्णी यांनी लीलया साकारला आहे. या दोन्ही पात्रांनी सिरीजला एक मराठी “ब्लेंड’ दिला आहे. कथा, दिग्दर्शन, अभिनय या वैशिष्ट्यांबरोबरच प्रत्येक एपिसोडला दिलेले नावसुद्धा रोचक आहेत. प्रत्येक एपिसोडचे नाव हिंदू पुराणातील काही संदर्भ देतात आणि त्यानुसार त्या एपिसोडमधील घटनाक्रम आहे.

प्रत्येक कलाकृतीचा एक आत्मा असतो, एक गाभा असतो. तो किती सहजतेने तुम्ही प्रेक्षकांसमोर नेता त्यावर त्या कलाकृतीची स्वीकार्हता अवलंबून असते. सॅक्रेड गेम्समध्ये अनुराग कश्‍यप आणि विक्रम मोटवाने यांनी ही गोष्ट योग्यरीत्या टिपली आहे. संपूर्ण मालिकेचा आत्मा असलेल्या मुंबई भोवतीच त्यांनी कथा ठेवली आहे. पूर्वीची आणि आताची मुंबई दाखवताना तिचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. मुंबईचा “लोकल टच’ देण्यासाठी मराठीचा वापर फार चपखल पद्धतीने केल्याचा दिसून येतो. काही सीन्स आणि शिवीगाळ काही जणांना अनावश्‍यक वाटेलही परंतु मालिकेला “क्‍लोज टू रिऍलिटी’ नेण्यासाठी या गोष्टी आवश्‍यक होत्या. पहिल्या 3 एपिसोड्‌समध्ये असलेली कथानकाची गती पुढच्या 3 भागांत काहीशी मंदावते, काही वेळाकरता भरकटल्यासारखीही वाटते. संपूर्ण सीजन पाहताना हीच एक गोष्ट थोडी खटकल्यासारखी वाटते. परंतू बाकीच्या वैशिष्ट्यांपुढे ही गोष्ट झाकोळल्या जाते. विक्रम चंद्रा यांच्या “सॅक्रेड गेम्स’ पुस्तकावर आधारलेल्या या सिरीजच्या पहिल्या सीजनमध्ये पुस्तकातील फक्त 25 टक्के भाग दाखवण्यात आलेला आहे. म्हणजेच पूर्ण पुस्तक संपवण्यासाठी अजून 3 ते 4 सीजन अपेक्षित आहेत. पहिल्या सीजनच्या शेवटच्या भागातील काही अनुत्तरित प्रशांची उकल आपल्याला पुढील सीजनमध्ये होईल. गायतोंडेच्या भूतकाळासोबतच त्रिवेदी आणि गुरुजी यांच्या व्यक्तिरेखा अजून स्पष्ट होतील.

नेटफ्लिक्‍सवर “सॅक्रेड गेम्स’च्या धमाकेदार एन्ट्रीमुळे भारतीय सिरीजसाठी एक नवे व्यासपीठ मिळाले आहे. चोखंदळ आणि जागतिक स्तरावरचा प्रेक्षकवर्ग व कमी प्रमाणात असलेली सेन्सॉरशिप ही वैशिष्ट्य असलेल्या नेटफ्लिक्‍सवर येत्या काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित दर्जेदार भारतीय सिरीज आपल्याला पाहायला मिळतील म्हणल्यास वावगं ठरणार नाही. याच व्यासपीठावर आकर्षक विषय, साजेशी कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि तोडीच्या अभिनयाने नटलेल्या “सॅक्रेड गेम्स’ची रोलर कोस्टर राईड सर्वांनी एकदा नक्कीच अनुभवली पाहिजे.

– शिवम पिंपळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)