मुंबई – आपल्या भूमिकांमुळे नेहमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता ‘नवाझुद्दीन सिद्दीकी’ दरवेळी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी तो दगड फोडणारा मांजी होतो तर कधी गँगस्टर गणेश गायतोंडे. दरवेळी काहीतरी भन्नाट करणारा नवाज सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे.
अभिनेत्याची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब मिळून तिला खूप त्रास देत आहे, तिला तिच्याच घरात कैद करण्यात आले आहे’. असे अनेक आरोप अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर केले आहेत.
दरम्यान, या सगळ्या वादातून दिलासा मिळावा म्हणून आज नवाझुद्दिन शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आश्रयाला गेलाय, अशी चर्चा होती. पण खरं कारण मात्र काहीतरी वेगळंच आहे. स्वतः अभिनेत्यानं या संदर्भातील एक ट्विट पोस्ट करत आपण राज ठाकरेंना कोणत्या कारणासाठी भेटलो… हे सांगितलं आहे.
मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे !
मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच !
सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !!
लवकरच @abhijitpanse यांच्या सोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) February 25, 2023
नवाझुद्दीन सिद्दीकी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, “मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे ! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच ! सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच अभिजित पानसे यांच्या सोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. जयमहाराष्ट्र”, असं ट्विट करत नवाझुद्दीनने केलं आहे.