हॉटेलचे बिल थकल्यामुळे नवाजुद्दीन अडकला

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया सध्या “बोले चुडिया’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. काही दिवसांपूर्वी सगळे युनिट शूटिंगसाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते या शूटिंगचे शेड्यूल संपले, तेव्हा निर्मात्यांकडचे सगळे पैसे समाप्त झाले होते. फाईव्ह स्टार हॉटेलचा खर्च, सगळ्या युनिटचा राहण्या-खाण्याचा खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाला. हॉटेलचे बिल द्यायला निर्मात्यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाही. अशावेळी हॉटेलच्या मॅनेजमेंटने कडक धोरण स्वीकारले आणि सिनेमाच्या सगळ्याच युनिटला हॉटेल सोडून जाण्यास मज्जाव केला. जोपर्यंत पूर्ण बिल दिले जाणार नाही, तोपर्यंत कोणालाही हॉटेल सोडून जाता येणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे इतर सहकलाकारांबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया हे देखील सर्व युनिट बरोबर या हॉटेलमध्ये अडकले.

मोठ्या मुश्‍किलीने या दोघांनी आपले सामान हॉटेलच्या बाहेर काढले आणि ते सटकले. मात्र बाकीचं सगळं युनिट हॉटेलमध्येच अडकून पडले. या प्रकरणाचा कोणताही गाजावाजा होऊ नये, यासाठी निर्मात्यांनी मोठा खटाटोप केला. मात्र तरीही ही बात मीडियाच्या नजरेतून सुटली नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते, याची खुमासदार चर्चा आता बॉलिवुडच्या गॉसिप कट्ट्यावर जोरदार सुरू आहे.

“बोले चुडिया’ या सिनेमाची कथा देखील काहीशी या प्रसंगासाठी आहे. बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका माणसाने चक्‍क स्वतःची फॅक्‍टरी उघडायचे ठरवले. आपला बिजनेस पॉप्युलर करण्यासाठी रॅप सॉंगचाही वापर त्याने केला. या गाण्याचे शूटिंग राजस्थानमध्ये झाले होते आणि त्यासाठीच सगळं युनिट तिथे गेले होते.

“बोले चुडिया’ साठी मौनी रॉय अगोदर लीड ऍक्‍ट्रेस होती. पण तिने नवाजुद्दीन बरोबर काम करायला नकार दिला. त्यामुळे तमन्ना भाटियाची निवड केली गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.