मुंबई – नार्कोटिक्स कंटोल ब्युरो म्हणजेच एनसीबीवर पुराव्यानिशी गेले काही दिवस आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पुराव्यानिशी एनसीबीवर हल्लाबोल केला आहे. एनसीबीने एका जप्तीच्या प्रकरणात फ्लेचर पटेल नावाच्या इसमाला साक्षीदार बनवून त्याच्या सह्या घेतल्या आहेत.
या फ्लेचर पटेलचा जस्मीन वानखेडेंबरोबरच फोटो त्यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केला. या जस्मीन पटेल या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या भगिनी आहेत. तसेच खुद्द समीर वानखेडे यांच्या सोबतही फ्लेचर पटेल यांचा फोटो नवाब मलिक यांनी पत्रकारांना सादर केला. फ्लेचर पटेल हे समीर वानखेडे यांचे परिचीत असून ते एकमेकांना चांगले ओळखतात.
अशा ओळखीच्या माणसालाच समीर वानखेडे यांन जप्तीच्या कारवाईत साक्षीदार व पंच म्हणून कसे उभे केले असा सवाल त्यांनी केला आहे. फ्लेचर यांनी एनसीबीच्या एका जप्तीच्या पंचनाम्यावर पंच म्हणून सही केली आहे. त्या पंचनाम्याच्या प्रतिही नवाब मलिक यांनी पत्रकारांना सादर केल्या.
गेल्या आठवड्यात नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांशी संबंधीत तीन जणांना जहाजावरील कथित ड्रग पार्टीत अटक केल्यानंतर लगेच कसे सोडून दिले याची माहिती सादर केली होती. तसेच आर्यन खान याला भाजपचे कार्यकर्ते असलेलेच दोन जण एनसीबीच्या कार्यालयात कसे हाताला धरून नेत आहेत याचेही पुरावे सादर केले होते.
एनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा थेट सहभाग कसा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. तसेच जहाजावर जे ड्रग जप्त केल्याचे सांगितले गेले आहे, ती जप्तीची कारवाई जहाजावरीची नसून समीर वानखेडे यांच्या कार्यालयात करण्यात आलेली कारवाई होती याचेही पुरावे त्यांनी सादर केले आहेत. एनसीबीची जहाजावरील ड्रग पार्टीवरील कारवाई बनावट असल्याचा दावाही त्यांनी केला होता.