वानखेडेंवर टीका केल्याने राजस्थानातून धमकीचा फोन – नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – NCB ने मुंबई येथे कार्टीलिया क्रूजवर केलेली कारवाई सध्या राजकीय वादाचा विषय ठरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या कारवाईवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबी आणि समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं आहे. वानखेडे यांनी सेलिब्रिटींकडून दुबई-मालदीवमध्ये जाऊन वसुली केल्याचा खळबळजनक आरोप देखील मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय.

अशातच आता मलिक-वानखेडे यांच्यात सुरु असलेल्या आरोपप्रत्यारोपाच्या मालिकेला आज नवं वळण मिळालं आहे. मलिक यांनी राजस्थानमधून धमकी देणारा फोन आल्याचा दावा केला असून याबाबत तक्रार दिली असल्याची माहिती मिळत आहे. धमकीचा फोन राजस्थानातून आला असल्याचा दावा देखील केला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका आणि आरोप न करण्याविषयी कॉलमध्ये आपल्याला सांगण्यात आल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

तत्पूर्वी, नवाब मलिक यांनी, ‘करोना काळात सर्व सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय नेमक्या त्याच काळात मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते? काही लोकांना चुकीच्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांच्याकडून वसूली करण्याचा प्रयत्न मालदीव आणि दुबईत झाल्याचा’ आरोप केला आहे.

तर दुसरीकडे वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावताना, “नवाब मलिक चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्टी घालवण्यासाठी गेलो होतो. यासाठी मी विभागाची रीतसर परवानगी देखील घेतली होती. तिथे मी कुणालाही भेटलो नाही. अशा प्रकारच्या आरोपांना मला अजून काहीही उत्तर द्यायचं नाही. डिसेंबरमध्ये मी मुंबईत होतो. पण त्यांचा आरोप आहे की मी दुबईला होतो. याची चौकशी देखील ते करू शकतात” असं म्हटलंय.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.