नवरात्र विशेष : काली, लक्ष्मी आणि सरस्वती

अरुण गोखले

खरं तर आपल्याला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या तिन्ही देवतांचे दर्शन घरात मांडलेल्या घटातूनच घडते. फक्‍त ते पाहण्याची जाणून घेण्याची दृष्टी ही आपल्याला सद्‌गुरू कृपेने लाभावी लागते.
त्या आदिशक्‍तीने भक्‍तांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या, असुरांच्या संहारासाठी विविध रूपे घेतल्याचे आपण सप्तशती, देवी पुराण, देवी माहात्म्य ह्या ग्रंथांत वाचलेले आहे. त्याच कालीचं घटाजवळच रूप किंवा दर्शन म्हणजेच परडीत घातलेली काळी माती. काळी माती हीच काली. तिच्यातून उगवणारं धान हेच तिचे प्रकटन. ते उगवलेले धान किंवा धान्य हीच लक्ष्मी. ते लक्षात येणे, ज्ञात होणे हीच सरस्वतीची कृपा.
कालीनंतरचे दुसरे रूप लक्ष्मी. लक्ष्मी हा शब्दही फार महत्त्वाचा आहे.

या शब्दातून त्या देवतेची विश्‍वव्यापकता स्पष्ट होते. “लक्ष-मी’ ह्याचा अर्थ की माझ्याकडे पाहा. माझ्याकडे लक्ष दे, माझ्यावर कृपा कर, माझे कल्याण कर. ही लक्ष्मी आपण आपल्या व्यावहारिक जीवनात वेगवेगळ्या रूपात अपेक्षित असते. धन, धान्य, संपत्ती, संतती सौख्य ही त्या लक्ष्मीचीच आपल्याला अपेक्षित असणारी रूपे आहेत. ती लाभावीत ह्यासाठीच आपण जीवनभर प्रयत्न करीत असतो.

लक्ष्मी आणि पैसा हे दोन्ही शब्द जरी एकाच अर्थाचे असले तरी त्यात फार मोठा फरक आहे. सन्मार्ग, कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा याद्वारे जी लाभते ती लक्ष्मी. वाईट मार्ग, फसवेगिरी, नको त्या उलाढाली करून वाममार्गाने जो कमविला जातो तो पैसा. आपण लक्ष्मी जोडायची का पैसा कमवायचा, हे आपल्याला विवेक आणि विचाराने जी शिकविते ती सरस्वती.

सरस्वती ही आपल्याला ज्ञान देते. कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होणे हे त्या सरस्वतीचेच दर्शन आहे. आपल्याला हे ज्ञान, ही सद्‌सद्‌बुद्धीचे वरदानही ह्याच देवतेकडून मागून घ्यायचे आहे. का तर आपल्याला खरंखोटं, बरंवाईट, पापपुण्य, योग्य-अयोग्य याचे सुयोग्य आकलन होणे, हे जीवनात फार महत्त्वाचे असते.

एकदा का ह्या शक्‍तींचे नेमके स्वरूप आपल्याला समजले की ह्या तिन्ही देवता घटातच कशा आहेत आणि त्या तिथूनच कसे कार्य करतात हे आपल्या लक्षात येते. तोच अभ्यास ह्या उपासनेच्या बैठकीतून आपण साधायचा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.