तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु झाला आहे. दोन वर्षानंतर आता निर्बंध मुक्त उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. दरम्यान, आज दुपारी घटस्थापना करण्यात येणार आहे.
गर्भ घरात दाखल नंतर पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले आहोत. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची गेली 9 दिवसापासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर देवींची आरती करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव आज दुपारी घटस्थापनेने सुरु होणार आहे. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. देवीची मंचकी निद्रा ही वर्षातून 3 वेळेस असते. .