शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग

पुणे – शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळाली. परिणामी, मंडई परिसरामध्ये सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती.
अधिक महिन्यामुळे यंदाचे शारदीय नवरात्र 17 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत साजरा होणार आहे.

यंदा करोना पार्श्‍वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. नवरात्रासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शुक्रवारी दुपारनंतर अधिक गर्दी झाली होती. याशिवाय, शहरांतील देवीच्या मंदिरांवर रोषणाईची तयारी सुरू होती.

काही मंडळांनी लहान मांडवदेखील उभारले होते. या नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या साड्या, घट, मृत्तिका, दुरडी, कडकण्या, विविध प्रकारचे धान्य, फुले, फळे, नारळ, देवीची आभुषणे, पूजेची उपकरणे आदी साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. नवरात्राच्या अनुषंगाने महिला वर्गाचीदेखील लगबग सुरू आहे. घरातील साफसफाई, उत्सवाची तयारी आदी कामे वेगाने सुरू होती.

तर बाजारपेठांमध्ये जाण्याऐवजी नागरिकांकडून ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. विविध संकेतस्थळांच्या बरोबरीने व्हॉटस ऍप, फेसबुकवरून नागरिक खरेदी करत आहेत.

गरबा, पठण, जागरण-गोंधळ कार्यक्रम रद्द
यंदाचा उत्सव साधेपणाने होत असल्याने गरबा, पठण, जागरण-गोंधळ आदीचे कार्यक्रम रद्द केल्याने नवरात्रोत्सवाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. प्रामुख्याने शहरात विविध ठिकाणी गरब्याचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कार्यक्रम नसल्याने घागरे, दांडीया, दागिने आदींची राज्याबाहेरून होणारी आवकदेखील घटली आहे. त्यामुळे दरवर्षी या साहित्यांनी सजलेली दुकाने यंदा सुनीसुनी आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.