पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून (रविवार) शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आई राजा उदो.. उदो.., जय अंबे… जय दुर्गे मॉं… च्या गजरात घरोघरी आणि शहरातील विविध मंदीरात घटस्थापना करण्यात आली.
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचा काळ. दुर्गा, शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, महिषासूरमर्दिनी, महाकाली अशा विविध अवतारांत नऊ दिवस युध्द करुन राक्षसांचा वध करणाऱ्या शक्तिदेवतेच्या उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. नागरिकांनी देवीची मनोभावे पुजा करुन घट बसविले तसेच आकुर्डी येथील तुळजाभवानी, निगडी-प्राधिकरण येथील दुर्गादेवी (टेकडी), खराळआई, दापोडी येथील पिरंगाई, नेहरुनगर येथील संतोषीमाता, पिंपरी गावातील वैष्णवीदेवी, काळेवाडी आणि चिखली येथील तुळजाभवानी माता, तर थेरगाव येथील मोहटादेवी मंदीरामध्ये आज सकाळपासूनच विधिवत पुजा करुन दुपारी महुर्तानुसार घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेनंतर सर्वच मंदीरात दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनस्थापने नंतर खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. त्यामुळे, शहरातील सार्वजनिक मंडळानी नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज घटस्थापनेमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पहावयास मिळाले.