“खासदार नवनीत राणांनी लक्ष घातलं असतं, तर कार्यक्षम महिला अधिकारी वाचल्या असत्या”

मुंबई – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केली. या प्रकरणात एक सुसाईड नोट सापडली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता असून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका होत आहे.

खासदार नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले.

दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटनुसार त्यांनी नवनीत राणा यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्याकडे नवनीत राणा यांच्याकडून दुर्लक्ष झालं. हाच धागा पकडून नवनीत राणा या हत्येत अप्रत्यक्ष सहभागी आहेत का, असा प्रश्न चाकणकर यांनी ट्विट करून विचारला आहे. याआधी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत होती.

“DFO विनोद शिवकुमार हे गावकरी आणि इतर कर्मचाऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करतात, अपमान करतात. करण नसताना रात्री भेटायला बोलावतात. त्यांचे ऐकले नाही की निलंबनाची धमकी देतात,” असे दीपाली चव्हाण यांनी चार पानांचा सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

“यापूर्वी रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली नसल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. IFS अधिकारी ही IFS अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार असाही उल्लेख चिट्ठीत करण्यात आला आहे. गर्भवती असतांना मला ट्रॅकवर बोलावले जायचे. गर्भवती असतांनाही मालूरच्या कच्च्या रस्त्यावरून मुद्दामून फिरवले जायचे. त्यामुळे माझा गर्भपात झाला. तरीही मला ड्युटीवर बोलावण्यात आले. ‘अट्रोसिटीच्या’ धमक्या मिळायच्या. चार महिने जेलमध्ये गेल्यावर कस वाटेल अशाही धमक्या दिल्या जायच्या,” असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

“DFO शिवकुमार हे नेहमी माझे आर्थिक आणि मानसिक नुकसान कसे होणार याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे. अनेकदा त्यांनी मला एकटे बोलावून माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने वागत नसल्यामुळे ते त्रास द्यायचे. माझे वेतन त्यांनी रोखून धरले. माझ्या मृत्यूनंतर तरी रोखलेले वेतन तात्काळ काढावे आणि याचा लाभ माझ्या आईला द्यावा,” अशी विनंती दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये केली आहे.

पती राजेश मोहिते यांना शेवटच्या कॉलवर तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते तुम्हाला शेवटच बघायचे आहे, असे म्हणून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.