मुंबई – हनुमान चालिसावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या दाम्पत्याला अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर नवनीत राणा यांनी पोलिस प्रशासनावर आरोप केले होते. त्याला मुंबई पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवनीत राणा यांनी आपल्याला कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप केला होता. तसेच आपण मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेलं नाही. बाथरूमला देखील जाऊ दिलं नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता.
दरम्यान नवनीत राणा यांनी अशा आशयाचं पत्रच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले होते. या पत्राची दखल घेत बिर्ला यांनी संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी थेट पुराव्यासह उत्तर दिलं आहे.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
संजय पांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस कस्टडीत चहा पिताना दिसत आहेत. व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात असतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. त्यामुळे आणखी काही सांगायची गरज आहे का? असा प्रश्न संजय पांडे यांनी व्हिडीओ शेअर करून उपस्थित केला आहे.