दोन आरोपींना मंचर पोलिसांनी अवघ्या सहा तासात पकडले
मंचर- मंचर-गांजाळेमळा (ता. आंबेगाव) येथे घराच्या मालकीच्या जागेवरून दोन आरोपींनी संगनमत करून नवनाथ गांजाळे (वय 42) यांची हत्या केली. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी खुनाला वाचा फोडून सचिन गांजाळे आणि विनोद तांबडे या दोन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक केली.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गांजाळे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली होती. नवनाथ गांजाळे यांचा मृतदेह विहिरीत सापडला. रविवारी (दि. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास मंचर ते गांजाळेमळा रस्त्यावर सरकारी विहिरीजवळून नवनाथ गांजाळे घरी येत असताना सचिन एकनाथ गांजाळे (रा. गांजाळेमळा) यांच्यामध्ये घराच्या जागेच्या कारणावरून वाद सुरू होता. भांडणाचा राग मनात धरून सचिन गांजाळे आणि त्याचा मित्र विनोद तांबडे यांनी नवनाथ गांजाळे यास हाताने आणि दगडाने मारहाण करून त्याची हत्या करून त्यांना विहिरीत टाकले, अशी माहिती नवनाथ गांजाळे यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांना मिळाली होती.
अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात सचिन गांजाळे आणि विनोद तांबडे यांच्याविरोधात नवनाथ गांजाळे यांचा खून केल्याची तक्रार दिली. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी अवघ्या सहा तासांत सचिन गांजाळे आणि विनोद तांबडे यांना अटक केली. संबधित आरोपींनी नवनाथ गांजाळे यांनी डोक्यात दगड टाकू खून केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करीत आहे.