नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर काल नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षातील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर पंजाबच्या मंत्रिमंडळातील रझिया सुलताना यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे तर ही परिस्थिती जास्तच चिघळली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय गोंधळ सुरू असताना एकीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “१७ वर्षांचा माझा राजकीय प्रवास एका हेतूने होता. पंजाबच्या लोकांचं आयुष्य सुधारणं आणि मुद्द्यांच्या राजकारणावर स्टँड घेऊन ठामपणे उभं राहणं हाच माझा धर्म आहे”, असे ते म्हणाले.
हक़-सच की लड़ाई आखिरी दम तक लड़ता रहूंगा … pic.twitter.com/LWnBF8JQxu
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 29, 2021
दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्यांनी पंजाबमधल्या सध्याच्या परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे. “मी नेहमीच पंजाबी जनतेच्या भल्यासाठी लढत राहीन. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कायम उभा राहीन. माझ्या वडिलांनी मला नेहमीच सत्याच्या मार्गावर चालायला शिकवलं आहे. मी कधीही माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही. माझ्या नैतिकतेशी तडजोड करणार नाही. पंजाबमध्ये सध्या समस्या आणि धोरणांशी तडजोड होत असल्याचं मला दिसतंय. मी हाय कमांडला फसवू शकत नाही आणि त्यांची फसवणूक होऊ देऊ शकत नाही”, असे सिद्धू या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान सिद्धू यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनीही प्रतिक्रिया दिली असून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले. “सिद्धू आमचे प्रमुख आणि चांगले नेते आहेत. मी काय सांगणार जेव्हा मला काहीच माहिती नाही,” असे यावेळी ते म्हणाले. तसेच आपल्याला सिद्धू यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.