नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये प्रवासी साखर झोपेत असताना एका प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. नवी मुंबईतील एरोली परिसरात भर रात्री हा भीषण अपघात झाला. ठाणे बेलापूर रोडवर भरधाव एसटी थेट दुभाजकावर धडकल्याने हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
अपघातग्रस्त एसटी ठाण्याहून महाडच्या दिशेने जात होती. यादरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रात्री एक ते दीडच्या दरम्यान प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात झाला. भरधाव एसटी थेट दुभाजकावर धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त एसटी बसमधून जवळपास 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते.
या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक वयस्कर प्रवाशी या बसमध्ये होते. प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाल्याने सगळे बेसावध होते. त्यामुळे काही लोक गंभीर जखमी झाले.