लोकसभेतील ‘जय श्रीराम’ घोषणांना खासदार नवनीत कौर राणांचा आक्षेप

नवी दिल्ली – आजपासून नवी दिल्ली येथे सुरु झालेल्या १७व्या लोकसभेच्या प्रथम अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी लोकसभेमध्ये ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्याने नवा वाद उफाळून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अमरावती येथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांनी आक्षेप नोंदवला असून लोकसभा हे अशा घोषणा देण्याचे स्थान नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्या म्हणाल्या, “मी सगळ्या देवांना मानते. सगळे देव एकच आहेत या मताची मी आहे. मात्र कुणावर तरी निशाणा साधण्यासाठी जय श्रीरामचे नारे द्यायचे ही बाब अयोग्य आहे.”

तत्पूर्वी आज संसदभवनामध्ये पश्चिम बंगाल येथील भाजपचे नवनिर्वाचित खासदार बाबुल सुप्रियो आणि देबश्री चौधरी शपथ ग्रहणासाठी पुढे आले असता संसदेमध्ये उपस्थित असलेल्या भाजप खासदारांनी त्यांचे ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत स्वागत केले होते.

भाजप ‘जय श्रीराम’ नाऱ्याद्वारे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना का टार्गेट करतंय?

गेल्या ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना काही लोकांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ ८ लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतर हा वाद पेटला असून लोकसभा निवडणुकांदरम्यान देखील भाजप नेत्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवरून मनात बॅनर्जींना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच देशभरातील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नावे ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठवली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.