डेरवण बंधाऱ्याला मिळणार नवसंजीवनी

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याच्या आमदारांच्या सूचना
बंधाऱ्याची दुरुस्ती कोयना व्यवस्थापनाकडे
चाफळ विभागातील डेरवण व कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी येथील बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेता याठिकाणी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असते. या बंधाऱ्यांना लागलेल्या गळतीमुळे बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाळून मोठे नुकसान होत आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी कोयना धरण व्यवस्थापनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे तातडीने सुरु होतील अशी शेतकऱ्यांमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उमेश सुतार 

कराड –चाफळ विभागातील डेरवण व कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी येथील बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. या दोन्ही बंधाऱ्यांमध्ये येत्या पावसाळ्यातील पाणी साठण्यासाठी दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना आ. शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चाफळ विभागातील डेरवण व कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी या बंधाऱ्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच पाणीसाठा नियोजनाची जबाबदारी कोयना धरण व्यवस्थापनाकडे असून याचे सर्व नियोजन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्याकडे आहे. या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देऊन येत्या पावसाळ्यातील पाणी या दोन्ही बंधाऱ्यात अडविणेकरिता 5 मार्च रोजी आ. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी आ. देसाई यांनी चाळकेवाडी व डेरवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा कार्यकारी अभियंता पाटील यांचेकडून घेतला व त्यानुसार त्यांनी पाटील यांना सूचना केल्या आहेत.

चाळकेवाडी कुंभारगांव येथील बंधाऱ्यांची सांडवा गळती, गेटची दुरुस्ती, मातीकाम, कॅनॉल दुरुस्ती तसेच बंधाऱ्यांच्या मुख्य भिंतीचे पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बंधाऱ्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे-झुडपे काढणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे असून डेरवण येथील बंधाऱ्याचे मुख्य गेटच्या दुरुस्तीचे काम करणे अत्यंत आवश्‍यक आहे. तर डेरवण बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचल्याने तो काढणे आवश्‍यक आहे.

चाळकेवाडी कुंभारगांव बंधाऱ्याच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामासाठी शासनाने निधी मंजूर करुन दिला आहे. मंजूर झालेल्या निधीतून या गेटचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्याची सांडवा गळती, मातीकाम, कॅनॉल दुरुस्ती तसेच मुख्य भिंतीचे पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बाहेर मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे-झुडपे काढणे ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डेरवण बंधाऱ्याच्या मुख्य गेटचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन घेण्याकरिता आवश्‍यक असणारा निधी मंजूर करुन देण्यात येणार असल्याचे सिंचन मंडळाकडून सांगण्यात आले. याही बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार असल्याचे अभियंता कुमार पाटील यांनी आ. देसाई यांना सांगितले.

आ. शंभूराज देसाई यांनी हे दोन्ही बंधारे गाळमुक्त करण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आवश्‍यक असणारी यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी. याकरिता लोकसभेची आचारसंहिता झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकही घेणार असल्याचे यावेळी म्हणाले. दरम्यान, चाळकेवाडी व डेरवण या दोन्ही बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामांना गती देऊन या दोन्ही बंधाऱ्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात साठावे. यासाठीचे नियोजन संबधित यंत्रणेने तातडीने करावे व ही दुरुस्तीची कामेही लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावीत तसेच पाणी वाटपाच्या संदर्भातील निर्णय हा बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर घेऊ, असेही आ. शंभूराज देसाई यांनी कार्यकारी अभियंता व त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)