“रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे कट्टर विरोधक नवालनी यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो”

डॉक्‍टरांनी भीती व्यक्त केल्यानंतर रुग्णालयात नेण्याचा निर्णय

मॉस्को – गेल्या तीन आठवड्यांपासून तुरुंगातच उपोषण करत असलेले रशियातले विरोधी नेते अलेक्‍सी नवालनी यांना दुसऱ्या कारागृहात रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. रशियातील सरकारी कैदी सुधारकगृहाने आज ही माहिती दिली. 

तीन आठवडे उपोषण करत असलेले नवालनी यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशी भीती डॉक्‍टरांनी व्यक्त केल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय करण्यात आला. रुग्णालयातील विटामिन थेरपीला नवालनी यांनीही सकारात्मक तयारी दर्शवली आहे. मात्र आपल्या उपचारांबाबत आणि रूग्णालयात दाखल करण्याबाबत त्यांनी साशंकताही व्यक्त केली आहे.

नवालनी यांना मॉस्को पासून 180 किलोमीटर अंतरावरील व्लादिमीर शहरातील सुधारगृहातील रुग्णालयात नेले जाणार आहे. नवालनी यांच्या रक्तामध्ये पोटॅशियमची मात्रा वाढली आहे. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो असे त्यांच्या डॉक्‍टरांनी म्हटले आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे कट्टर विरोधक

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या नवालनी यांना जानेवारी महिन्यात जर्मनी वरून परतल्यानंतर लगेच अटक करण्यात आली होती. कथित विषप्रयोगानंतर ते उपचारांसाठी पाच महिने जर्मनीला गेले होते. मात्र त्यामुळे नवालनी यांनी पॅरोलच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्यांना अडीच वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. 

नवालनी यांच्या शिक्षेवर संपूर्ण रशियातून जोरदार टीका

नवालनी यांच्या अटकेवर आणि त्यांना सुनावलेल्या शिक्षेवर संपूर्ण रशियातून जोरदार टीकाही झाली होती. तुरुंगामध्ये आपल्याला वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याच्या आरोपावरून नवालनी यांनी तीन आठवड्यांपूर्वीपासून उपोषण सुरू केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.