“निसर्ग’नेच हिरावला त्यांचा निवारा पण…

पिंपरी: बुधवारी झालेल्या “निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका अनेकांना बसला आहे. याचा सर्वाधिक फटका झाडांवर घरटी करुन राहणाऱ्या पक्ष्यांना बसला आहे. सांगवीतील एका झाडावर पक्ष्यांची तीन घरटी होती. मात्र वादळात ते झाडच पडल्याने निसर्गाने त्यांचा निवारा हिरावून घेतला. मात्र त्या पक्ष्यांनी याचे दुःख न करता दुसऱ्याच दिवशीच्या सकाळपासून शेजारच्या झाडावर पुन्हा घरट उभारण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे पक्ष्यांनी मानवाला दिलेला हा संदेशच आहे.

“निसर्ग वादळामुळे पिंपरी चिंचवड शहरात अडीचशेहून अधिक झाडे पडली. यामुळे अनेक मोटारी, घरे, वीज वाहक तारा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेकजण आपल्याला सरकारकडून काही मदत मिळते का, याची वाट पाहत आहे. बुधवारच्या वादळात सांगवीतील एक झाड पडले. या झाडावर तीन पक्षांची घरटी होती. त्यातील एका घरट्यात अंडीही होती.

रात्र कोणत्यातरी दुसऱ्या झाडावर काढल्यानंतर सकाळी त्या पक्षांनी पुन्हा नवीन झाडाची निवड करीत पुन्हा घरटे बांधण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या या नवीन घरट्याकडे आसपासचे नागरिक कुतुहलाने पाहत असल्याचे निसर्गप्रेमी रविंद्र वाघवले यांनी सांगितले. झालेल्या घटनेमुळे रडण्यापेक्षा भविष्याचा विचार करून ते पक्षी पुन्हा कामाला लागत या मुक्‍या पक्ष्यांनी मानवाला दिलेली ही एक शिकवणच म्हणावी लागेल.

अद्‌भुत अभियंते

एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने ते झाड पडले. मात्र त्यांनी प्रेमाने विणलेल्या घरट्याची एक काडीही हलली नाही. झाडाच्या फांद्यांवर बांधलेल्या घरट्यांना या अद्‌भुत अभियंत्यांनी इतक्‍या कुशलतेने बांधले होते की या मोठ्या वादळात विशाल झाड कोसळले. परंतु घरट्यांना काहीही विशेष नुकसान झाले नाहीत. परंतु दुर्दैवाने झाड कोसळताना एका घरट्यातील अंडे पडून फुटले. यामुळे त्या माता-पिता पक्ष्यांना नक्‍कीच वाईट वाटले असणार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.