…तर निसर्गसुद्धा “झिंग झिंग झिंगाट’

बारामती – याड लागलंय… याड लागलंय हे गाण म्हणण्याऐवजी “झाड लावलंय’… “झाड लावलंय’… असे म्हणून तसे वागलो तर निसर्गसुद्धा झिंग झिंग झिंगाट होईल, असा संदेश डॉ. पांडुरंग गावडे व त्यांचा परिवार देत असून यास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. गावडे यांनी सांगितले.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागे होऊन “खूप खूप झाडे लावली’ पाहिजे या हेतूने डॉ. गावडे यांनी “खूप-खूप झाडे लावा’ हा उपक्रम या पावसाळ्यात हाती घेतला आहे. मेडद (ता. बारामती) येथील डॉ. पांडुरंग गावडे व त्यांच्या पत्नी डॉ. उज्वला गावडे तसेच गावडे हॉस्पिटल मधील कर्मचारी, पंढरीनाथ मदने, लक्ष्मण मोरे, अजित कांबळे, बारीकराव कांबळे, दत्तात्रय गावडे, मेडद ग्रामपंचायत, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ दर रविवारी वृक्षारोपणचे काम करतात. तसेच वृक्षारोपण व संवर्धन व्हावे यासाठी मेडद येथील प्राथमिक शाळा, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या सहकार्याने वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये अनेक पर्यावरण जागृतीपर बॅनर तयार करून देण्यात आले, सर्व मुलांनी वृक्ष दिंडी व वृक्षारोपणसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

डॉ. पांडुरंग गावडे व पंढरीनाथ मदने रोज सकाळी व्यायामासाठी सायकलिंग करतात त्यावेळी त्यांना ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी ते झाडे झावता. यासाठी गावडे यांनी सायकला एक खास कॅरियर बसवली आहे त्यात टिकाव, फावडे व रोपे ठेवलेले असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी जागा दिसेल त्या ठिकाणी खड्डा खणायचा आणि झाडे लावायचे असा त्यांचा नित्यक्रम आहे. तसेच त्या रस्त्याने जा-ये करताना ते निगाही राखण्याचे काम ते करीत आहे. याद्वारे ते स्वतःच्या आरोग्या बरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घेतात. पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवण्यासाठी खारीचा वाटा उचलतात.

वृक्षतोड केल्यास त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तरच वृक्षतोड थांबेल. तसेच प्रत्येक कुटुंबाने 10 झाडे लावावीत व त्यांचे संगोपन करावे असा कायदा शासनाने तयार करावा तर आणि तरच पर्यावरण वाचून पृथ्वी वाचेल आणि पुढच्या पिढ्यांचे भवितव्य घडेल.
– पांडुरंग गावडे, डॉक्‍टर, मेडद

Leave A Reply

Your email address will not be published.