Natsamrat | : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अलीकडेच नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या अभिनय प्रवासाबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीतील अजरामर कलाकृती ठरलेल्या नटसम्राट या चित्रपटामागील एक महत्त्वाचा निर्णय उलगडला. ‘नटसम्राट’ हे गाजलेलं नाटक रंगभूमीवर करण्यास आपण स्पष्ट नकार दिला होता आणि फक्त चित्रपटातच ही भूमिका स्वीकारली, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. (Nana Patekar) कार्यक्रमात बोलताना नाना म्हणाले, “मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी ‘नटसम्राट’ हे नाटक करणार नाही, पण चित्रपट नक्की करेन. कारण एखादी भूमिका जगण्यासाठी त्यात स्वतःचा पूर्ण जीव ओतावा लागतो. अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका ही केवळ अभिनय नसून ती मानसिक आणि शारीरिक पातळीवर कलाकाराला पूर्णपणे हादरवून टाकणारी आहे.” (Nana Patekar) ते पुढे म्हणाले, “जर मी या नाटकाचे १०, १५ किंवा २५ प्रयोग केले असते, तर कदाचित त्यानंतर मी जिवंत राहिलो नसतो. या भूमिकेची तीव्रता इतकी प्रचंड आहे की प्रत्येक प्रयोगात कलाकाराला स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. त्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत त्या पात्राचं दुःख, वेदना आणि भावविश्व पोहोचवणं शक्य नाही.” (Nana Patekar) यावेळी त्यांनी ‘नटसम्राट’ साकारलेल्या दिग्गज कलाकारांचाही उल्लेख केला. “डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट्ट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांनी हे नाटक रंगभूमीवर साकारलं. या प्रत्येक कलाकाराने त्या भूमिकेत स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं,” असं नाना यांनी सांगितलं. (Nana Patekar) अप्पासाहेब बेलवलकर या पात्राच्या भावनिक वजनाबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “या भूमिकेमुळे कलाकाराच्या मनावर आणि हृदयावर प्रचंड ताण येतो. म्हणूनच मी रंगभूमीवरील प्रयोगांऐवजी चित्रपट माध्यमाची निवड केली. चित्रपटात भूमिका साकारताना पात्राची तीव्रता जपता येते, पण सततच्या प्रयोगांचा ताण सहन करावा लागत नाही.” दरम्यान, नटसम्राट हा चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ‘नटसम्राट’ या नाटकावर आधारित असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. (Nana Patekar) चित्रपटात नाना पाटेकर यांनी गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे आणि विक्रम गोखले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.