बंगळुरु – बेंगळुरुतल्या कृषी मेळाव्यात विक्रीसाठी आणलेल्या बैलावर तब्बल एक कोटीची बोली लागली आहे. या बैलाचं नाव कृष्णा आहे. कृष्णाचे मालक बोरेगौडा यांच्या म्हणण्यानुसार, या बैलाच्या सिमेनला शेतकऱ्यांमध्ये खूप मागणी आहे. याच्या वीर्याचा एक डोस 1 हजार रुपयांना विकला जातो. त्यामुळे या मेळाव्यात हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. लोकांनी त्याच्यासोबत भरपूर सेल्फी काढले आहेत.
यंदाचा बंगळुरुतला कृषी मेळावा कोट्यवधींच्या कृष्णानं गाजवला आहे. कृष्णा हा हल्लीकर जातीचा बैल असून त्याचे वय अवघे साडेतीन वर्ष आहे. तर लांबी 8 फूट असून वजन 800 किलो आहे. त्याचे वीर्य खूप महाग आहे. कारण सध्या शहरांमध्ये म्हशी आणि जर्शी गायींपेक्षा देशी गायींच्या दुधाला जास्त मागणी आहे. कृष्णा हा सुद्धा एक देशी गोवंश आहे. याच्यामध्ये कुठलंही मिश्रण नाही. त्यामुळेच याचं वीर्य शेतकरी मोठी रक्कम देऊन विकत घेतात. देशी गायींपासून ए2 पद्धतीचं दूध मिळतं, हे दूध शहरांमध्ये 120 ते 150 रुपये लीटरपर्यंत विकलं जातं.
दरम्यान, हा मेळावा बंगळुरुतल्या GKVK कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 4 दिवस मेळावा चालणार आहे. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी 60 हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी 1 लाख 10 हजाराहून अधिक लोक मेळाव्यात पोहचले आहेत. यावेळी मेळाव्यात कृष्णा हा बैल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.