सध्याच्या जागतिक घसरणीमुळे तेल कंपन्यांकडून तूर्तास दरवाढ नाही
पुणे – देशभरामध्ये युरो-6 या उत्सर्जन मानदंडाचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेल पुरवठा बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना किंवा वितरकांना कसल्याही अडचणी आल्या नाहीत. विशेष म्हणजे, या नव्या इंधनाचे दर जुन्या इंधनापेक्षा काही प्रमाणात वाढणे गृहीत धरले जात होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये तेल कंपन्यांनी दरवाढ टाळलेली आहे.
नव्या इंधन निर्मितीसाठी जुन्या इंधन निर्मितीपेक्षा एक रुपये जास्त खर्च येतो. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कंपन्यांनी वाढ केली नाही. याची कारणमीमांसा करताना या कंपन्यांनी सांगितले की, सध्या जागतिक क्रूड बाजारात क्रूडचे दर सतरा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलेले आहेत. त्यामुळे कच्चे इंधन आम्हाला स्वस्त पडत आहे. परिणामी आम्हाला दरवाढ न करता शुद्ध इंधन पुरवठा करता येणे शक्य झाले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंह त्यांनी या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर काम करीत होतो. या अगोदर 16 मार्च रोजी इंधनाच्या दरात बदल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर इंधनाच्या दरात कसलाही बदल करण्यात आलेला नाही. करोना व्हायरस आणि मंदीमुळे जागतिक बाजारात तेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे तेलाचे दर घसरले आहेत. आगामी काळात भारतीय ग्राहकांना या घसरलेल्या दराचा फायदा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
देशात थेट बीएस-6 इंधनाचा वापर…
भारतामध्ये बीएस-4 इंधन विकले जात होते. मात्र, उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने त्यानंतर बीएस-5 ऐवजी थेट बीएस-6 प्रकारचे इंधन वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढ्या मोठ्या देशांमध्ये एवढे मोठे काम तेल कंपन्यांनी केवळ तीन वर्षांत पूर्ण केले आहे. त्यामुळे भारतातील उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे, अशा प्रकारच्या इंधनावर चालणारी वाहने तयार करण्याचे काम बहुतांश मोटार कंपन्यांनी अगोदरच सुरू केलेले आहे.